लोकनेते गोपीनाथ मुंडे

माझ्या आठवणीतला एक असा प्रसंग मांडावासा वाटतो की, ज्यात एका अशा नेत्याचे दर्शन घडते जो की, सतत कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहिला. कार्यकर्त्यांवर आलेलं संकट त्याने नेहमीच स्वतः चे समजले. संभाजीनगर येथे ऊसतोड आंदोलन शेतक-यांच्या ऊसाला भाव मिळावा म्हणुन करण्यात आले. त्या आंदोलनात हजारोच्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता. परंतु परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला व माझ्यासह अन्य कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. त्याप्रसंगी एकही क्षण विचार न करता त्या नेत्याने सर्वांना शासकीय रुग्णालयात नेले व सर्वांचा इलाज होईपर्यंत जातीने तिथे थांबले. स्वतः खुप जखमी असतांना देखील स्वतः चे दु:ख विसरुन त्यांनी कार्यकर्त्यांना सांभाळले, सर्वांची आपुलकीने काळजी करणारा असा नेता आम्हांला लाभला ह्या पेक्षा सौभाग्य ते काय ! तो नेता म्हणजे अर्थातच लोकनेते दिवंगत मा. श्री. गोपीनाथरावजी मुंडे साहेब !

विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ता, आमदार, उपमुख्यमंत्री, खासदार ते केंद्रीय मंत्री अशी उंची गाठलेले महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील शक्तीशाली नेते आणि शेतमजुर – शेतक-यांसाठी लढणारे खरे लोकनेते म्हणजे गोपीनाथ मुंडे! कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना महाराष्ट्रभर भाजपाचा झेंडा संघर्ष करत त्यांनी रोवला. गेल्या साडे तीन दशकात बहुजनांचे आधार व पक्षाचा चेहरा बनलेले मुंडे साहेब यांच्या अचानक निधनाने संपुर्ण महाराष्ट्र हळहळला व महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्या दिशेने कलाटणी घेण्यास सुरवात झाली.

साहेब तुमच्या शिवाय महाराष्ट्राचे राजकारण ही कल्पना सामान्यातला सामान्य माणुस सुद्धा करू शकत नव्हता. तुम्ही सांसदीय लोकशाहीच्या मुख्य प्रवाहापासुन लांब असलेल्या जाती-समुहांची मोट बांधली. महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. राजकारणाला समाजकारणाची जोड असली पाहीजे असं नुसतं बोललं जातं. मुंडे साहेबांनी मात्र आपल्या राजकीय वाटचालीला समाजकारणाची जोड दिली. त्यांनी कधीही कोणत्याही टप्प्यावर तडजोड केली नाही. सत्तेच्या प्रलोभनाला बळी पडले नाही किंवा सत्तेच्या ताकदीपुढं झुकलेही नाहीत. वादळीबेदरकार स्वभाव असल्याने गणपती दुध पिण्याच्या कृतीचे अवैज्ञानिक समर्थन करणा-या स्वतःच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यालाही फटकारण्याचा बेडरपणा मुंडे साहेबांत होता.प्रचंड राजकीय समन्वयवादी दृष्टी आणि लोकसंग्रह यामुळे ते लोकनेता झालेत.

नव्या राजकारणात कार्यकर्त्यांना उभं करण्याऐवजी त्यांना मिंधे करण्यावर भर दिला जातो. पण मुंडे साहेब अशा राजकारणापासुन दुर राहिले, त्यांनी माणसं उभी केली, माणसं जपली, कार्यकर्ते घडवले आणि एक नवा आदर्श उभा केला. अशाप्रकारे लोकांच्या मनात घर केल्यामुळे जनतेचे खरे लोकनेते ठरले. लोकसंपर्क अन्यायाविरुद्ध संघर्षाची नुसतीच तयारी नव्हे तर जिद्द, नवा विचार, नवे तंत्रज्ञान एकुणच जे नवे चांगले ते हवे, असा उत्साह असलेले नेते मुंडे साहेब यांनी भाजपाला जनमाणसात स्थान मिळवुन दिले. रुढार्थाने महाराष्ट्राची भुमी भाजप चळवळीस फारशी अनुकूल नसताना राज्यात भाजपचा झेंडा सातत्याने फडकवत ठेवणारे व एकुणच सिंहाचा वाटा उचलणारे नेते म्हणुन त्यांची ओळख अवघ्या महाराष्ट्राला आहे.­­

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव पाडतील असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके मोजके नेते आहेत. त्यात मुंडे साहेब ठळकपणे उठुन दिसतात. त्यांची प्रतीमा कायमचं अत्यंत पुरोगामी आणि सर्वसमावेशक राहिली. महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण आणि सामाजिक भान ठेवुन त्यांनी सतत काम केले. राज्यातील प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि त्यासाठी अथक मेहनत घेण्याची तयारी तसेच प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची धडाडी, याचबरोबर कार्यकर्त्यांचे आणि लोकांचे संघटन करण्याचे कौशल्य, संसदीय कामकाजाचा गाठा अभ्यास, अत्यंत प्रभावी वक्तृत्व आणि कर्तृत्व असे सर्वगुणसंपन्न नेतृत्व महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे भाग्य असेच म्हणावे लागेल.

मा. मुंडे साहेबांच्या कार्याचे अनुकरण करीत मी नेहमीच मार्गक्रमण करत आहे. तळागाळातील जनतेला सुखी करण्याचे व त्यांना समृद्ध करण्याचे स्वप्न मुंडे साहेबांनी पाहिले होते. परंतु काळाने आज त्यांना आपल्यातून हेरावून नेले. मात्र त्यांनी दिलेली शिकवण कायम लक्षात ठेवून त्यांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यास मी कायम कठीबद्ध राहील. मुंडे साहेबांची भुमिका, विचारधारा व कार्यपद्धती यांचे अवलोकन करुन सतत त्यांना अवलंबण्याचा प्रयत्न माझा राहील.

Share And Rate This Article.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Connect

Get in touch with Us

If you've any enquirey, let us know we'll call you back.

NGA Branding India Pvt. Ltd.

Office:

NGA, C-38, Front lane of MIT Hospital, Sector N 4, Cidco, Aurangabad, Maharashtra 431005

+91 96238 14222

Email: info@nga.co.in

Website: www.nga.co.in