भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १८९१ मध्ये महू मध्यप्रदेश येथे झाला. शिक्षणासाठी शिष्यवृत्तीच्या आधारे अमेरिकेला गेले. परदेशात असतांनाच त्यांना कोलंबिया विद्यापीठाने पी.एच.डी. हि पदवी बहाल केली. १९२५ मध्ये त्यांनी हि डॉक्टरेट पदवी मिळवली, त्याचा विषय होता “नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया- ए हिस्टोरिकल अँड अँनॅलिटिकल स्टडी.” त्याच बरोबर कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र याविषयांचे अध्ययन केले. पुढे त्यांनी लंडन विद्यापीठात डि. एस्सी. हि पदवी मिळवली.
तत्कालीन प्रखर अश्या सामाजिक विषमतेमुळे बालपणीच त्यांच्या मनावर वाईट प्रतिबिंब कोरल्या गेले. त्यामूळे भारतात आल्यानंतर सामाजिक विषमता दूर करण्याच्या हेतूने त्यांनी कार्य केले .व त्यासाठी त्यांनी मूकनायक ,बहिष्कृत भारत ,जनता ,आणि प्रबुद्ध भारत अशी वृत्तपत्रे चालवली.त्या काळात भारतात प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रात अस्पृशांचे प्रश्न मांडले जात नव्हते.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र वृत्तपत्रांची निर्मिती केली, त्यातून ते सामाजिक विषमता,राजकीय घडामोडी व नवीन समाजाची निर्मिती या अनुषंगाने लिखाण करत.विशेष म्हणजे त्यांनी कधीही ह्या वृत्तपत्रांचा वापर आपल्या स्वतः च्या पक्षाची ध्येयधोरणे राबवण्यासाठी केला नाही. त्यांचे लिखाण केवळ अस्पृश्यच नव्हे तर स्पृश्य समाजाच्या लोकांना देखील विचार करायला लावणारे होते.याशिवाय समाज उन्नती साठी त्यांनी अनेक ग्रंथही लिहलेत.सर्व माणसे सामान आहेत कोणी उच्च नाही व कोणी निचही नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते.ते कर्ते समाज सुधारक होते आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी समानतेचे धडे दिलेत .
जातीय उतरंड, चातुर्वर्ण्य व्यवस्था या व्यवस्थेत शूद्र मानल्या जाणाऱ्या जातीवर होणारे अत्याचार याबाबत त्यांच्या मनात विलक्षण चीड होती.त्यांनी नेहमीच त्यांच्या कृतीतून समानतेचे तत्व बिंबवले.त्यांनी दाखवून दिले कि शिक्षण घेऊन ते सुशिक्षित झाले असले तरी समाजबांधवांना ते विसरलेले नाहीत. त्यांचे दुःख दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तत्कालीन अस्पृशांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी व त्यांच्या हक्कासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १९३० ला नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह सुरु केला. मंदिरात जर अस्पृश्य लोकांना प्रवेश मिळाला तर त्यांचा अस्पृश्यतेचा प्रश्न सुटण्यास हातभार लागेल हा त्या मागचा उद्देश होता.१९२७ मध्ये महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह त्यांनी केला .अस्पृश्य लोकांना तळ्यावर पाणी भरण्यास मनाई होती, त्यांना तळ्याचे पाणी भरता यावे ह्यासाठी हि लढाई होती. ह्या वर्ण व्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे त्यांनी जाहीर दहनही केले.
प्रथमतः त्यांनी हिंदू धर्मात राहून अस्पृश्यता मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु आपले लक्ष साध्य होत नाही व न्याय मिळत नाही हे लक्षात आल्यावर १९५६ मध्ये त्यांनी नागपूर येथे ५ लाख अस्पृश्य बांधवांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला व बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन धर्म -परिवर्तनाची घोषणा प्रत्यक्षात आणली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे फक्त अस्पृश्यच्या हक्कासाठी लढले असे नाही तर हिंदू स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा,संपत्तीतील हक्क,घटस्फोट इ बाबतीत स्वतंत्र मिळावे म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल संसदेत मांडले परंतु ते नामंजूर झाल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला.१९३० सालच्या गोलमेज परिषदेत त्यांनी ब्रिटीशांना भारत सोडा असा इशाराही दिला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय कृषी व्यवस्थेची देखील चांगली जाण होती. पूर्वीच्या काळी “खोती” पद्धत अस्तित्वात होती. ही एक प्रकारची शोषण करणारी व्यवस्था होती. ती खोती पद्धत नष्ट करणारे कायदे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेत.
१९४७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे न्यायमंत्री झाले, नंतर भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. राज्य घटनेच्या निर्मितीमधील त्यांचे योगदान हे कदापीही विसरण्याजोगे नाही, म्हणूनच राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना संबोधले जाते. असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर १९५६ ला हे जग सोडून गेले. परंतु त्यांचे विचार आजही आपणास प्रेरित करतात. अशा या महामानवाला त्रिवार अभिवादन !!!
Share And Rate This Article.